- संस्थेच्या विविध ध्येयपूर्तीसाठी आपण मदत करू इच्छित असाल तर त्या निधीला तुम्हाला करातून सवलत मिळेल
- आमचा इमेल : sgspm12@gmail.com
१९६१ सालची गोष्ट आहे ही. सहा दशकांहून अधिक काळ गेला आहे. स्व. डॉ. भा. वि. जोशी , स्व. श्री. एस. के. पांडे , श्री. आर. आर. कानवडे हे सर्वजण २५ ते ३० वयाचे दरम्यान असलेले शिक्षक होण्यासाठी लागणारी जुजबी पात्रता असताना, स्वत:च्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असताना, आर्थिक दृष्टया अतिशय दुर्बल असणाऱ्या अशा शिक्षक मित्रमंडळीनी नाशिकरोड येथे संस्था सुरु करण्याचे ठरविले. जोडीला पै . श्री. अत्तार , कै. श्री. अरिंगळे , कै. श्री. ई . वाय. फडोळ व कै. शिवरामे हे समाजवादी विचारांचे , परंतु तेही आर्थिकदृष्ट्या दुर्बल मंडळी ! येवून मिळाली आणि या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा जन्म झाला. ही मंडळी वयाने सिनियर होती. परंतु त्यांचा उत्साह मात्र खूप होता. सर्वांची चांगली नाळ जमली आणि संस्थेचे बीजारोपण झाले. संस्थाचालक म्हणून कामकाज सुरु झाले. संस्थाचालक म्हणून अंगावर प्रचंड जबाबदाऱ्या येवून पडल्या. संस्थेच्या या कामात सर्वांनी सर्वस्व अर्पण केल. सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत संस्था एक संस्था ! कौटुंबिक उत्सव , सणवार , कौटुंबिक समारंभ याकडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नसायचा. शिक्षक मंडळीना स्वत:ची नोकरी सांभाळून संस्थेचे काम करावे लागत असे. या कार्याची एकप्रकारची सर्वांत झिंग, नशा चढलेली असे. कामकाजात कोण काय बोलतो, काय निंदा करतो याकडे लक्ष देण्यासही कुणालाच वेळ मिळत नव्हता. संस्थेचे काम जस जसे सुचत गेले तसे ते करत राहिले, यश मिळत गेले आणि आज भव्य दिव्य अशी वैभवशाली परंपरा असलेली संस्था नावारूपाला आली आहे.
संस्था म्हटले की ती चालवायची हे अवघड व जिकरीचे काम आणि ते ही पैशाशिवाय ! म्हणजे तारेवरची कसरत असे. जिद्दीने तेही केल. कोणत्या न कोणत्या प्रकारे संस्थेला पैसा जमविणे हा एक ध्यास घेतला आणि मग त्यासाठी संस्थेच्यावतीने विविध प्रकारचे 'नाट्य प्रयोग' केले. इतर संस्थाची नाटके कंत्राट पद्धतीने घेतली. ऑर्केस्टा , सांस्कृतिक कार्यक्रम केले. अशा अनेक युक्त्या वापरून त्यातून पैसे जमवले. शिक्षकांच्या पगारात वाढ झाली की , त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करायचे व त्यातून पैसा मिळवायचा अशा अनेक गोष्टी सूचत गेल्या , त्याचे नियोजन केले आणि संस्थेला आर्थिक मदत होत गेली. सरकारी अनुदाने काटेकोरपणे मिळतील यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेतली. संस्थेच्या नावाची कॅलेंडर्स छापली ती विकून त्यातून पैसे मिळविले. सुरुवातीचे दोन तीन वर्षे तर दिवाळीत फटाक्यांचे दुकाने लावली, या शिवाय वैक्तिक ओळखी पालखीतून आर्थिक मदत मिळविली. अशा प्रकारच्या अनेक मार्गांनी संस्थेला आर्थिक मदत मिळविण्यात आली. संस्थेचा कारभार तेव्हा पासून आजपर्यंत काटकसरीने चालत आहे. हे सर्व चालत असताना संस्थेचे पालक, नागरिक यांचेशी संबंध अतिअश चांगले निर्माण केले. आज संस्थेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही.
आर्थिक जडण घडणी बरोबरच संस्थेत काम करणाऱ्या सर्व सेवकांत निष्ठेने काम करण्याचा संस्कार रुजविला .शाळांचा दर्जा वाढत गेला. १० वी, १२ वी चे निकाल चांगले लागत गेले. जनमाणसात, सरकारी दरबारी शाळेचा नावलौकिक वाढीला लागला. संस्थेबद्दल चांगले संदेश समाजात गेले आणि संस्था अग्रगण्य ठरली. संस्थेच्या इमारती आणि शाखांचा विस्तार सातत्याने होत राहिला. अथक परिश्रम आणि उत्तम नियोजन संस्था करत राहिली.
खर म्हणजे ही संस्था अगदी सामान्य शिक्षकांनी चालवलेली संस्था, या संस्थेवर शिक्षकांशिवाय कोणी नाही, नाही सभापती, नाही लखपती, नाही नगरसेवक, नाही आमदार, नाही मंत्री, नाही बागाईतगार, नाही कारखानदार, नाही उद्योगपती असे असूनही एखादा विचार घेऊन एकदिलाने, एकमुखाने, एकविचाराने काम केल्यास ते कसे यशस्वी होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे हि संस्था होय. यासाठी संस्थाचालकांच्या कुटुंबियांना खूप हाल अपेष्टा , त्रास, अपमान , यातना सहन कराव्या लागल्यात. त्यांच्या प्रत्येकाच्या धर्म पत्नींचे सहकार्य लाभलेले आहे.मुलाबाळांचे शिक्षण असेल त्या परिस्थितीत पूर्ण केल. संस्थाचालकांनी झपाटून काम केल्याने संस्था नावारूपाला आली आहे.